ओस पडली वाडे ओस पडली गावं आणि माणुसकी
खूप दिवसांनंतर सहजच वाटले गावात चक्कर मारावी. मनात आले की निघालो आमच्या वाड्याकडे .. आटोळ्यांचा वाडा वाहिरा गावातील प्रसिद्ध वाडा. गाडी वाड्यासमोर उभे केली. पाहतोय तर काय उंच वाड्यासमोर तितक्याच उंच वेड्या वाकड्या बाभळी वाढलेल्या आहेत. वाड्याची पडझड झालेली. वाडा ओस पडला आहे. तिथं आटोळ्यांचे तीन वाडे आहेत. एकेकाळी वाडा म्हणजे शान असायची. हा आमचा वाडा आहे असे अभिमानाने सांगायचे. ज्या वाड्यात आम्ही लहानाचे मोठे झालो. तिथं मला माझे बालपण आठवले. याच वाड्याच्या समोर मुले गोट्या, विटी-दांडू, कोया, नाना तऱ्हेचे खेळ खेळायची. लपाछपी, चोर-पोलीस खेळ रंगायचे. त्या वेळी हे वाडे वाड्यांचा परिसर माणसांनी गजबजून गेलेला असायचा. गावाचे मुख्य ठिकाण म्हणजे तो वाडा आणि समोरची जागा. वाडा संपूर्ण कोरीव घडीव दगडात बांधलेला. आता खोल्यांचे बांधकाम केलेलं . आतच धान्य साठवण्याचे ठिकाण बळद असायचे. न्हाणी पाणी काढून देण्यासाठी मोरी असे. समोर बसण्यासाठी मोठा ओटा . समोरून रस्ता व मोकळी जागा असे. या जागेत गणपती उत्सवानिमित्त कार्यक्रम व्हायची. भैरवनाथ यात्रा निमित्त पालखी मिरवणूक वाड्यासमोर यायची. मग रात्रीचं वाड्यासमोर तासनतास लेझिम डाव खेळ चालायचे. सारा गाव या वाड्याच्या ओट्यावर बसून हे डाव पाहत होते. गावातील लेझिम डाव बंद झाले आणि डीजे आले. आमच्या वाड्या पुढे गाणे वाजले पाहिजे . गाणं वाजू द्या गाणं वाजू द्या लोक म्हणू लागली. डाव, गाणे वाजले पाहिजे म्हणून गावातील ज्यांचे वाडे आहेत त्यांचा अट्टाहास असायचा. कधी कधी प्रतिष्ठापायी हमरीतुमरी होत. आमच्या वाड्यासमोर रामचंद्र माळशखरे यांचे दुकान होते. दुकान आणि घर शेजारी शेजारी होते. ते तिथेच राहायचे. दुकानदारी व्यवसाय कसा करावा हे त्यांनी गावाला शिकवले. त्यांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायची. त्याकाळी ठराविक सधन लोकांकडेच टीव्ही, गाडी असायची. त्यातीलच हे दुकानदार होते. आम्ही त्यांच्या घरी टीव्ही पहायचो. टिव्ही बंद केली की उठून जायचो. त्यावेळी ठराविक वारीच चित्रपट असायचे ते पाहण्यासाठी गर्दी जमायची. रामायण, महाभारत, शक्तिमान , अलिफ लैला या मालिकांचा तो काळ होता. अगदी शांत बसून , कसलीही बडबड न करता, सारखे चॅनल न बदलता टीव्ही पाहण्याचा तो काळ. एकच चॅनल ते म्हणजे दूरदर्शन ..
वाडा म्हणजे एकत्र कुटुंब असायचे. आत वेगवेगळे कुटुंब राहायचे. एका वाड्यात म्हणजे एक खुट आहे असे समजायची. आम्ही या खुटातले त्या खुटातले हे वाड्यावरून ठरत असे. एका वाड्यात 10 -15 कुटुंब तरी राहत होती. गप्पा गोष्टी एकमेकांची विचारपूस चालायची. एकमेकांना मदत केली जायची. न सांगता न विचारता एकमेकांची सुख दुःख जाणायची . जशा वाड्याच्या भिंती भक्कम होत्या तशी वाड्यातली माणसं एकमेकांचा आधार होती. ज्यांचा वाडा ती माणसं गावात प्रतिष्ठित समजली जायची. लोकसंख्या वाढली तशी जागा अपुरी पडत गेली. एक एक कुटुंब आपल्या आपल्या सोयीने शेतात , वस्तीवर , इतर ठिकाणी राहायला गेली. हळूहळू वाड्यांची पडझड होऊ लागली. भक्कम वाड्याला तडे जाऊ लागले. जसा एक एक माणूस बाहेर पडत गेला तसा वाडा ओस पडू लागला. माणसं एकत्र होती तोपर्यंत सुसंवाद होता. प्रेम माया ममता जिव्हाळा एकमेकांचा आधार होते माणसं. जशी सोयीनुसार बाहेर पडली तशी आपापल्या सोयीने वागू लागली. सोयीनुसार भेटू लागली. माणुसकीचा झरा आटत गेला. अलीकडच्या काळात गावातील बहुसंख्य वाडे ओस पडली. गाव बाहेरून सुधारले अन् आतून पोखरले. गवत झाडे वाढल्यामुळे वाडे असून दिसेनासी झाली. एकेकाळी हा माझा वाडा अभिमानाने सांगणारी माणसं वाड्याकडे फिरकत सुद्धा नाहीत. गरज सरो वैद्य मरो तसे वाड्यांची गरज संपली आणि वाडे ओस पडले.
जरी वाडा ओस पडला तरी अजुनही भिंती मजबूत आहेत. माणुसकी प्रेम जिव्हाळा आधार देणारा हा वाडा. त्या आठवणी जिवंत आहेत.
मी तिथून निघणार तेवढ्यात तो वाडा बोलू लागला..
जरी ओस पडलो मी
भिंत मजबूत आहे
माझा प्रत्येक दगड
चौकोनी चीरा आहे….
ऊन वारा पाऊस झेलत
मी वर्षानुवर्ष उभा आहे
जपून ठेवल्या आठवणी
त्याचा मी साक्षीदार आहे ….
आज तू आलास इथे
खूप बरे वाटले मला
घुसमटत होता जीव
जीवात जीव आला….
जरी मी आज पडलो
ना कसली मज तमा
जिथं माझा दगड जाईल
तिथं राहील पुन्हा उभा …
शब्दांकन
ह.भ.प.किसन आटोळे सर
लेखक कवी प्रवचनकार